
एफएमएससीआय कडून कार्याची दखल; पहिल्याच पुरस्काराचे मानकरी, चेन्नईत विशेष सन्मान
नाशिक- कार रेसिंगच्या क्षेत्रात आपला दबदबा निर्माण करणाऱ्या फेडरेशन ऑफ मोटार स्पोर्टस् क्लब ऑफ इंडियातर्फे प्रथमच दिल्या जाणाऱ्या बेस्ट कॉम्पीटीटर रिलेशन ऑफीसर(सीआरओ) पुरस्कारासाठी वेस्टर्न इंडिया स्पोर्टस् असोसिसशनचे जेष्ठ पदाधिकारी श्रीरंग मच्छे उर्फ पांडु काका यांची निवड समितीने एकमताने निवड केली. चेन्नईत आज झालेल्या राष्ट्रीय सोहळ्यात अध्यक्ष अरींधम घोष आणि झेन खान यांच्या हस्ते त्यांना बेस्ट सीआरओ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यापुर्वी `विसा ला उत्कृष्ठ आयोजनांबद्दल एफएमएससीआयकडून दोन-तीनदा सन्मानित करण्यात आले होते, श्री. मच्छे यांच्या या पुरस्कारामुळे पुन्हा एकदा `विसा च्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे, एफएमएससीआयने यंदाच्या वर्षापासून रॅलीच्या कामकाजात झोकून देणाऱ्या स्वयंसेवकांसाठी पुरस्कार देऊन त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारण्याचे ठरवले. त्यानुसार संलग्न मोटारस्पोर्टस क्लबकडून सीओसी, रेस डायरेक्टर, मार्शल, सेप्टी ऑफीसर,डेप्युटी सीओसी, सीआरओ,स्टेज कमांडर आदी पुरस्कारासाठी अशा स्वयंसेवकांची नावे मागविण्यात आली होती. बहुतांश क्लबनी आपल्या स्वयंसेवकांची नावे विविध पुरस्कारासाठी पाठवली.
विसासाठी गौरवास्पद बाब
गेल्या दोन दशकांपासून श्री.मच्छे हे राष्ट्रीय कार रॅलीमध्ये सीआरओची प्रमुख जबाबदारी सांभाळत आली आहे आणि स्पर्धेक,चालकांचे सुध्दा ते आवडते सीआरओ आहे. श्री. मच्छे यांची या पुरस्कारासाठी एफएमएससीआय ने निवड केली. या पुरस्काराच्या रूपाने त्यांच्या कार्याची दखलच घेतली असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. श्री.मच्छे यांना पांडुकाका याच नावाने सर्वत्र ओळखले जाते, त्यांना पुरस्कार मिळाल्याने विसा आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांसाठी ही एक आनंददायी आणि गौरवास्पद बाब असल्याचे सर्वांनी नमूद केले.